जयललिता यांच्या मृत्यूनंतरही बँक खाते सक्रीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चेन्नई

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांचे बँक खाते अद्यापही सक्रीय असून त्यात नियमित पैसे जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अजब प्रकारामुळे आयकर विभागही चक्रावला आहे.

जयललिता यांचे 5 डिसेंबर 2016 साली निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या काही आठवड्यानंतर 2017 मध्ये त्यांचा मालकी हक्क असलेली पोस गार्डन हाऊस यांसह अन्य तीन संपत्ती जप्त करण्यात आल्या होत्या. या तिन्ही संपत्तीवर 16 कोटी रुपयांचा कर येणे बाकी होते. यामुळे त्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र या संपत्तीच्या जप्तीनंतरही त्यांचे भाडे जयललिता यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे.

त्यानुसार जयललिता यांच्या वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा होत आहेत. हे पैसे त्यांच्या स्थावर संपत्तीचे भाडे म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यात जमा होत आहेत. दरम्यान जयललिता यांच्या संप्ततीच्या करवाढीची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.