तुम्ही जर चेकने व्यवहार करत असाल तर ही बातमी वाचाच…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

धनादेश न वटल्याप्रकरणी मधुकर सौदागर रोडके (रा. खादगाव) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी एक महिन्याची शिक्षा ठोठावली. तसेच 2 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.

भरत जयद्रथ उफाडे राहणार टाकळी बु. यांनी मधुकर सौदागर रोडके यांना 11 मार्च 2010 रोजी दोन लाख रुपये हात उसने दिलेले होते. 5 जुलै 2011 रोजी दोन लाख रुपयांचा धनादेश भरत उफाडे त्यांना देण्यात आला होता. बंद असलेल्या खात्याचा धनादेश न वटता बँकेतून परतल्याने फिर्यादीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लातूर येथे कलम 138 अन्वय फिर्याद दाखल केली होती. साक्षी पुरावा पाहून मधुकर रोडके यास एक महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली असून दोन लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत भरली नाही तर एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय येथे अपील दाखल करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर डी पाटील यांनी धनादेश न वटल्याने शिक्षा सुनावली व दोन लाख 50 हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. रक्कम न दिल्यास पुन्हा एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.