सुप्रसिद्ध लावणी कलावंत शांताबाई काळे यांची घरासाठी शासनदरबारी फरपट, मानधनही मिळेना

एके काळी लावणीचा फड गाजविलेल्या सुप्रसिद्ध कलावंत शांताबाई काळे यांची हक्काच्या घरासाठी व मानधनासाठी फरफट सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून घरासाठी शासन ते प्रशासनाचे उंबरटे झिजविणाऱया शांताबाई काळे यांना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या त्या आई असून, ‘सांगा, कसं जगायचं?’ असा आर्त टाहो त्या फोडत आहेत.

राज्यात एके काळी लावणीचा फड गाजविणाऱया लावणीसम्राज्ञी तथा ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या प्रसिद्ध कादंबरीचे दिवंगत लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज सोलापुरात आल्या होत्या. मंजूर झालेले घर गेल्या 10 वर्षांपासून मिळालेले नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे घरासाठी पाठपुरावा करून त्या थकल्या आहेत. वयाची सत्तरी गाठणाऱया शांताबाई काळे यांना मदतीसाठी वर्षानुवर्षे शासन व प्रशासनदरबारी उंबरठे झिजवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेने त्यांना करमाळा तालुक्यातील नेरले येथे जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु अद्यापि बांधकाम अपूर्णच आहे. या कामाच्या पूर्ततेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अद्यापि त्या हलाखीचे जीवन जगत आहेत.

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे 1500 रुपयांचे मानधनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अत्यंत कष्टात जीवन जगणाऱया शांताबाई काळे यांनी एकुलता एक मुलगा किशोर याला वैद्यकीय शिक्षण देऊन मोठे केले. साहित्याच्या क्षेत्रात नावाजलेले ‘कोल्हाटय़ाचं पोर’ हे आत्मचरित्र लिहिणाऱया डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे 2007 साली अपघाती निधन झाले. अशा स्थितीतही त्या जीवन जगत असताना शासन व प्रशासनाचे शांताबाई काळे यांच्याकडे झालेले दुर्लक्ष अस्वस्थ करणारे आहे.

हक्काच्या घरात शेवटचा श्वास घेण्याची इच्छा!

z शांताबाई काळे यांना आपल्या संघर्षमय जीवनाची वाटचाल सांगताना अश्रू अनावर झाले होते. ‘‘चार जिल्हाधिकारी बदलले तरी न्याय मिळत नाही. अधिकारी व मंत्र्यांचे उंबरठे झिजवून मी थकले आहे. स्वाभिमानाने जगण्याची सवय असल्याने आतापर्यंत हात पसरले नाहीत. लोकांच्या प्रेमामुळेच आज मी जगत आहे. हक्काच्या घरात शेवटचा श्वास घ्यावा, ही इच्छा आहे,’’ असे सांगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दोन वेळा भेटूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.