शेतात नागडा फिरणाऱ्या सहकाऱ्याला शेतमजुराने हतोड्याने हाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोबत काम करणाऱ्याला हतोड्याने हाणल्याने एका शेतमजुराला दीड वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना सिंगापूरमधील लिम चू कांग भागात घडली होती. सॉ पाईंग सो थू असं आरोपीचं नाव असून त्याला 6 तारखेला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावर आंग विन तूत याला गंभीररित्या जखमी केल्याचा आरोप होता. सॉ याने न्यायालयात त्याचा गुन्हा कबूल केल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तूत हा काही दिवसांपूर्वी अंगावर एकही कपडा न घालता मत्सशेतीच्या ठिकाणी आला होता. सॉ याने त्याला भडकून ‘नागड्याने फिरू नकोस, कपडे घालून ये’ असं सुनावलं होतं. 9 एप्रिल रोजी ‘सॉ’ जेवण बनवत होता. यावेळी तूत आंघोळ करून पुन्हा नागड्याने फिरायला लागला होता. ‘सॉ’ जेवण बनवत असताना तूत हा नागड्याने त्याच्या मागे येऊ उभा राहिला होता. तूत पुन्हा कपडे न घालता फिरत असल्याचं दिसल्याने सॉ भयंकर संतापला होता. त्याने तूत याला झाप-झाप झापलं आणि कपडे न घालता फिरू नको अशी तंबीही दिली होती.

हा सगळा प्रकार झाल्यानंतर ‘सॉ’ दारू प्यायला बसला होता. रात्री 10 च्या सुमारास सॉ झिंगला होता. झिंगलेल्या अवस्थेतही तो ‘तूत’ हा नागडा फिरत असल्याने संतापाने धुमसत होता. त्याने जवळच पडलेला एक हतोडा घेतला आणि तूत याला शोधायला सुरुवात केली. तूत हा फोनवर बोलताना सॉ याला दिसला होता. तूत दिसताच सॉ याने त्याच्यावर हतोड्याच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात तूतच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर सॉ याला अटक करण्यात आली होती.