जनावरांच्या चारा छावण्या 15 जुलैपर्यंत चालू ठेवाव्यात; शेतकऱ्यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

यावर्षी 1972 पेक्षाही भीषण दुष्काळाचा सामना शेतकर्‍यांना, ग्रामीण जनतेला करावा लागत आहे. या परिस्थितीत गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करत शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु केल्या. आता मोठ्या पावसानंतर छावण्या बंद झाल्यावर शेतकर्‍यांना जनावरे पुन्हा घरी न्यावी लागतील. मात्र, चारा उपलब्ध होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. या काळात मदत मिळाली नाही तर आतापर्यंतच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरु शकते. यासाठी सरकारने 15 जुलैपर्यंत चारा छावण्या सुरु ठेवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना सुरु केली आहे. याअंतर्गत शेतकर्‍यांना तांदूळ, गहू, डाळ आदी शिधा दिला जात आहे. या योजनेंतर्गत शिवसेनेच्यावतीने नगर तालुक्यातील कौडगाव येथील छावणीत शेतकर्‍यांना अन्नधान्यरुपी शिधा वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.गाडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, सभापती रामदास भोर, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, संदीप गुंड,प्रकाश कुलट बाळासाहेब बिबे, लक्ष्मण खर्से, संपत लिपणे, हरि पालवे, युवराज काळे, सोमनाथ थोरात, भिमा खर्से, सोमनाथ कांडके, संतोष कांडेकर, सोमनाथ थोरात आदी उपस्थित होते. शरद झोडगे म्हणाले की, शिवसेना हा गोरगरीबांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी कर्तव्यभावनेने शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न शासनाकडून सोडवून घेतानाच त्यांना वैयक्तिक मदत करून शिवसेना शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.