
सामना प्रतिनिधी । आष्टी
आष्टी येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगरुळ येथे पोपट विठोबा दिंडे (वय 60) वर्षे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्याचे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोपट विठोबा दिंडे आपल्या गुरांच्या गोठ्यात सोमवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वा गळफास घेऊन आत्महत्या केली. पाऊस पडेल या आशेवर त्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. परंतु पाण्याअभावी शेतातील पीकं डोळ्यासमोर जळाली. तसेच कांद्याला केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे त्यांनी कंटाळून गुरांच्या गोठ्यात सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी आष्टी पोलिसांनी तपास केला असून मृतदेहाचे शवविच्छेदन आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मंगळवारी दिनांक 29 रोजी मंगरुळ येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्जबाजारी पणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोपट दिंडे हे ताण तणावाखाली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास बीट अंमलदार अशोक केदार व शिवप्रताप तवले करत आहे.


























































