
आधुनिक काळात अजूनदेखील अनेक शेतकरी पारंपरिक नैसर्गिक असलेल्या संकेतावर विश्वास ठेवत आहेत. त्यामध्ये चातक पक्ष्याचे अर्थातच स्थानिक भाषेत पावशाचे आगमन आणि त्याची ‘पेरते व्हा…’ अशा सुरावटीत लक्ष वेधून घेणारा आवाज शेतकऱ्यांनी ऐकला म्हणजे मान्सून उंबरठय़ावर आल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मान्सूनच्या आगमनाची वर्दी देण्याचे काम शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळख असलेल्या चातक पक्ष्याकडून केले जातो. स्थानिक भाषेत पावशा म्हणून ओळख असलेल्या पक्ष्याचे आगमन शेतशिवार परिसरात होताच मान्सून लवकरच दाखल होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होतो.
मृग नक्षत्रात लाल रंगाचे मखमली नाजूक किडे शेतशिवारात वावरू लागल्यावर पाऊस आता हमखास बरसणार, अशी अटकळ शेतकरी बांधतो. एकूणच आधुनिक संगणकीय, डिजिटल युगात आजही शेतकरी पारंपरिक संकेतांवर विश्वास ठेवत आहे. बळीराजा आता याच प्रतीक्षेत आहे.





























































