दीड महिन्यात 3 लाख शेतकऱयांचे वीजबिल झाले कोरे, 1184 कोटींची थकबाकी वसूल

शेतकऱयांकडे थकीत असलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने सुरू केलेल्या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल दोन लाख 92 हजार शेतकऱयांनी आपली शंभर टक्के थकबाकी भरत वीजबिल कोरे केले आहे. तसेच 12 लाख 15 हजार शेतकऱयांची थकबाकीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे महावितरणची तब्बल 1184 कोटी रुपयांची वसूली झाली आहे.

राज्यात सुमारे 48 लाख कृषिपंपधारक शेतकरी असून त्यांच्याकडे जवळपास 45 हजार कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. प्रत्येक वर्षी सदर थकबाकी मागील पानावरून पुढे जात असल्याने महावितरणची आर्थिक काेंडी झाली होती. त्यापार्श्वभूमीवर कृषिपंप वीजधोरणांतर्गत थकीत वीजबिलाच्या वसुलीबरोबरच प्रलंबित वीजजोडणी देण्यास 1 मार्चपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार शेतकऱयांनी पहिल्या वर्षी आपल्या वीजबिलाची थकबाकी भरल्यास जवळपास एकूण वीजबिलावर सुमारे 66 टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे. पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक 1 लाख 52 हजार शेतकरी थकीत वीजबिलांतून मुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलांसह 50 टक्के सुधारित मूळ थकबाकीचा 300 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. कोकण प्रादेशिक विभागामध्ये 84 हजार शेतकऱयांनी 144 कोटी 18 लाख, नागपूर प्रादेशिक विभागामध्ये 41 हजार शेतकऱयांनी 55 कोटी 22 लाख आणि संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये 13 हजार 617 शेतकऱयांनी 35 कोटी रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत.

3722 कोटी रूपयांची घसघशीत सवलत

कृषिपंप वीजबिलाची थकबाकी भरण्याबाबत सुरू केलेल्या योजनेत ग्राहकाने सहभाग घेतल्यास त्यांना पहिल्या वर्षी वीजबिलाची रक्कम, दंड, व्याज या रकमेवर 66 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. त्यानुसार 12 लाखांहून अधिक शेतकऱयांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून त्यांना जवळपास 3722 कोटी रुपयांची सवलत लागू झालेली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात 4 लाख 78 हजार शेतकऱयांना 1321 कोटी रुपयांची सवलत लागू झाली आहे. कोकण प्रादेशिक विभागात 3 लाख 64 हजार शेतकऱयांना 1129 कोटी रुपये, संभाजीनगर प्रादेशिक विभागात 2 लाख 66 हजार शेतकऱयांना 1104 कोटी तर नागपूर प्रादेशिक विभागातील 1 लाख 6 हजार 166 कोटी रुपयांची सवलत लागू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या