
गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर ढासळले होते; पण आता ऐन दिवाळीत मक्याचे दरही ढासळल्याने शेतकऱयांवर संकट कोसळले आहे. शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू या भुसार धान्याबरोबरच निधी पीक म्हणून कांद्याची लागवड करीत होता; पण ज्यावेळी शेतकरी कांद्याचे उत्पादन बाजारात घेऊन जातो नेमका त्याचवेळी कांद्याचा बाजारभाव पडलेला असतो. त्यामुळे शेतकऱयांनी कांदा पिकासाठी घातलेले भांडवलदेखील मिळत नाही. आत्ता काही शेतकरी कांद्याऐवजी मक्याचे पीक घेत होते. त्याला गेल्या वर्षापासून समाधानकारक बाजारभाव मिळत होता; पण गेल्या 15 दिवसांपासून व्यापाऱयांनी मक्याचे भावही पाडले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱयांवर दुहेरी संकट कोसळले असून, दिवाळी कशी पार पाडायची याची चिंता शेतकऱयांना सतावत आहे.
मे महिन्यापासून पाऊस सुरू आहे, त्यात कसे-बसे मका मक्याचे उत्पन्न घेतले. पावसाचे पाणी शेतात साठले असताना त्यातून कणसे काढून कितीतरी दिवस सुकवून कणसांची मळणी केली.
प्रतिकूल परिस्थितीत म्हणावे तसे उत्पादन मिळाले नाही. यंदाची दिवाळी पार पडेल या आशेवर शेतकरी होता. मात्र, आता मक्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अद्याप नुकसानभरपाई नाहीच!
– अतिपावसाने झालेली नुकसानभरपाई नुसती टीव्हीवरील बातम्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून मिळत आहे. प्रत्यक्षात खात्यावर मात्र काही मिळालेले नाही. त्यामुळे यंदा दिवाळीवर शेतमालाच्या ढासळलेल्या दराचे संकट घोंगावत आहे.
– गेल्या काही वर्षांत खतांच्या व औषधांच्या किंमती ज्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्या प्रमाणात शेतमालाच्या किंमती वाढवून मिळाव्यात. उसाचे पैसे कारखान्यांनी एकरकमी द्यावेत.
– एक त्रस्त शेतकरी.