दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाही. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने गेल्या 3 वर्षांपासून शेतात होणारी सततची नापिकी आणि दुष्काळ याला कंटाळून आत्महत्या केली आहे.

नागोराव दौला बनसोडे (रा. जवळगा पोमदेवी, ता. औसा, जि. लातूर) या शेतकऱ्याने सततचा दुष्काळ आणि नातीच्या लग्नाच्या विवंचनेत विष प्राशन केल्याने शासकीय रुग्णालय लातूर येथे मृत्यूशी झुंज देताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाश्चात दोन मुली व एक मुलगा आहे. मुलाला तीन मुली असून दोन मुली लग्नाला आलेल्या आहेत. नातीचे कसे लग्न करावे आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा? पावसाळा सुरु होऊन दिड महिना झाला तरीही पावसाचा पत्ता नाही. या विवंचनेत परवा दिवसभर शेतात फिरून आल्यावर नागोराव बनसोडे यांनी घरी आल्यावर विष प्राशन केले.