
सामना प्रतिनिधी । वडीगोद्री
दुष्काळ व सततच्या नापिकीला कंटाळून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेणापूरी येथील चाळीस वर्षीय तरुण शेतकरी याने स्वतःच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली.
अंबड तालुक्यातील रेणापूरी येथील शरद रामकृष्ण कवडे (४०) या शेतकऱ्याने सततची नापिकी व सोसायटीचे असलेले कर्ज परतफेड करू शकत नसल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेणापूरी शिवारातील गट नंबर ५७ मधील स्वतःच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च न पुरवू शकल्यामुळे ताण तणावातून कवडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
शरद कवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल के. एस दासर, वडीगोद्री तलाठी सजाचे तलाठी जोगदंड यांनी सदर घटनेची नोंद करुन पंचनामा केला आहे, असे हे.कॉ. दासर यांनी सांगितले.































































