घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱया बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकची तोडफोड करीत रास्ता रोको केला. यामुळे पंतनगर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मोहम्मद जमील बशीर सय्यद (35) आणि मोहम्मद रजा जमील सय्यद (7) अशी त्या बाप-लेकाची नावे आहेत.

जमील सायंकाळी टेक्निकल हायस्कूलमधून रजाला घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाला होता. घाटकोपर बस डेपोजवळ लक्ष्मीनगर परिसरात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. दोघेही रस्त्यात आडवे झाल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, पंतनगर पोलिसांनी ट्रकचालक सत्यभान जैयस्वार याला अटक केली आहे.