
<<जी . एन. पवार>>
‘सावित्रीबाई फुले ः समग्र वाङ्मय’ हे केवळ साहित्य संकलन नसून एकोणिसाव्या शतकातील सामाजिक क्रांतीचा जिवंत दस्तऐवज आहे. या ग्रंथात सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा सर्वांगीण आलेख आहे. कविता, भाषणे, पत्रे, निबंध, ऐतिहासिक लेखन आणि दुर्मीळ दस्तावेज यांच्या माध्यमातून हा ग्रंथ सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतो. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे एक महत्त्वाचे भाष्यकार जी. ए. उगले यांनी हे समग्र वाङ्मय संपादित केले आहे.
या समग्र वाङ्मयातील ‘काव्यफुले’ हा पहिला विभाग विशेष महत्त्वाचा आहे. या काव्यसंग्रहात प्रार्थनापर, निसर्गपर, सामाजिक प्रबोधनपर, संवादपर, आत्मपर, बोधपर आणि ऐतिहासिक अशा 41 कविता उपलब्ध आहेत. या कवितांमधून सावित्रीबाईंची काव्यप्रतिभा, सामाजिक जाणीव आणि प्रखर मानवतावाद स्पष्टपणे व्यक्त होतो. शिक्षणाचे महत्त्व, स्त्राr-पुरुष समानता, अज्ञानाविरुद्धचा संघर्ष, श्रमाचे मोल आणि आत्मसन्मान यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी आणि थेट भाषेत भाष्य केले आहे. त्यांचे काव्य वंचित बहुजन आणि स्त्राr घटकांचे दुःख दृष्टिगोचर करीत राहते.
‘जोतिबांची भाषणे’ या दुसऱया विभागात सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या भाषणाचे विषय मांडले आहेत. ‘सावित्रीबाईंची जोतिबास पत्रे’ हा या ग्रंथाचा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचा भाग आहे. जोतीराव फुले यांना लिहिलेल्या पत्रांतून सावित्रीबाईंची वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि करुणा दिसून येते. दुष्काळ, सामाजिक अन्याय, स्त्रियांची अवस्था आणि दलितांचे दुःख यांविषयी त्यांनी व्यक्त केलेली चिंता त्या काळातील संवेदनशील समाजसुधारकाचे दर्शन घडवते. ही पत्रे केवळ वैयक्तिक संवाद नसून त्या काळाचा सामाजिक आरसा आहेत. ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या चौथ्या भागात सावित्रीबाईंनी स्वकुळाची कथा, भारताचा राजकीय इतिहास, जोतीरावांचे क्रांतिशील जीवन आदि बावन्न कडव्यांत ओघवत्या शैलीत चितारले आहे.
‘सावित्रीबाईंची भाषणे’ हा विभाग सावित्रीबाईंच्या वत्तृत्वशैलीचे दर्शन घडवतो. उद्योग, विद्यादान, सदाचार, व्यसने आणि कर्ज यांसारख्या विषयांवरील भाषणांमधून त्या काळातील समाजजीवनाचे वास्तव समोर येते. प्रस्तुत ग्रंथाच्या सहाव्या भागात संपादक जी. ए. उगले यांनी 1939 साली शांताबाई रघुनाथ बनकर लिखित ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ एक दुर्मीळ दस्तावेज म्हणून सादर केले आहे. या समग्र वाङ्मयात समाविष्ट असलेले ऐतिहासिक आणि वैचारिक लेखन सावित्रीबाईंच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देते. जातिभेद, धार्मिक रूढी, स्त्राrदमन आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध त्यांची भूमिका स्पष्ट आणि निर्भीड आहे.
ग्रंथाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे परिशिष्टे आणि दुर्मीळ दस्तावेज. मोडी लिपीतील हस्तलिखिते, स्वाक्षऱया, टिपण्या आणि ऐतिहासिक नोंदी यांमुळे हा ग्रंथ संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. सावित्रीबाईंच्या बौद्धिक व्याप्तीचा, त्यांच्या अभ्यासाचा आणि बहुभाषिक जाणिवेचा पुरावा या दस्तावेजांतून मिळतो. भाषेच्या दृष्टीने हे वाङ्मय साधे, थेट आणि परिणामकारक आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य वाचकांसाठीही तितकेच महत्त्वाचे ठरते.
थोडक्यात, ‘सावित्रीबाई फुले ः समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ केवळ एका महान स्त्राrचे साहित्य सादर करत नाही, तर भारतीय समाजसुधारणेचा बौद्धिक इतिहास समजून घेण्यासाठी एक मूलभूत संदर्भग्रंथ ठरतो. स्त्राr-शिक्षण, सामाजिक समता आणि मानवीमूल्ये यांची जाण निर्माण करणारे हे वाङ्मय आजच्या काळातही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
‘सावित्रीबाई फुले ः समग्र वाङ्मय’
लेखक ः जी. ए. उगले
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे ः 176 ह किंमत ः रु. 250/-



























































