
अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कीन्ही गावाजवळ लग्नाची वरात घेऊन जाणारी खाजगी बस नाल्यात कोसळल्याने 1 महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 24 नागरिक जखमी झाले असून यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील कीन्ही गावाजवळ दुर्घटना घडली आहे. लग्न समारंभ आटोपून रात्री 10 च्या सुमारास खाजगी बस प्रवाशांना घेऊन राजुरा कडून नांदगाव येथे जायला निघाली होती. रात्रीच्या सुमारास वळणावर बस वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखालील नाल्यात बस कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेत मोठा आवाज आल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. स्थानिक नागरिकांनी बस मध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यावेळी बस मध्ये तब्बल 60 प्रवासी होते, या घटनेत 50 वर्षीय सुनंदा हरिदास मडावी यांचा मृत्यू झाला तर 24 नागरिक जखमी झाले. जखमी नागरिकांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.



























































