फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचा अंतिम १६ मध्ये प्रवेश, पनामाचा उडवला धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशिया सुरू असलेल्या २१ व्या फुटबॉल विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ट्यूनिशीयावर रडतखडत विजय मिळवणाऱ्या इंग्लंडने रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पनामाचा ६-१ असा धुव्वा उडवला. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी केनने गोलची हॅटट्रिक केली, तर जॉन स्टोनने दोन आणि जेस्सी लिंगार्डने एक गोल केला. पनामाकडून फिलीप बॅलोयने एकमेव गोल करत पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडने सलग दुसऱ्या विजयासह अंतिम १६ मधील आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने ट्यूनिशीयावर २-१ असा विजय मिळवला होता.

गोल –
१) इंग्लंडने सामन्याच्या आठव्या मिनिटाला कॉर्नर मिळवला. यावर हेडरद्वारे शानदार गोल करत स्टोन्सने इंग्लंडकडून पहिला आंतरराष्ट्रीय गोल करत संघाला १-० आघाडी मिळवून दिली.

२) त्यानंतर विसाव्या मिनिटाला इंग्लंडच्या जेस्सी लिंगार्डला चुकीच्या पद्धतीने रोखल्यामुळे इंग्लंडला पेनल्टी मिळाली. यावर गोल करत कर्णधार हॅरी केनने इंग्लंडची आघाडी दुप्पट केली.

३) दुसऱ्या गोलमधून सावरत नाही तोच लिंगार्डने स्टर्लिंगच्या पासवर मैदानी गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० केली.

४)मध्यांतराला पाच मिनिटांचा अवधी बाकी असताना स्टोन्सने सामन्यातील वैयक्तीक दुसरा गोल करत इंग्लंडची आघाडी ४-० अशी वाढवली.

५)पहिल्या हाफच्या इंज्यूरी टाईममध्ये पेनल्टीवर वैयक्तीक दुसरा गोल करत कर्णधार हॅरी केनने इंग्लंडची आघाडी ५-० अशी वाढवली.

६)मध्यांतरानंतर दुसऱ्या हाफमध्ये ६२ व्या मिनिटाला इंग्लंडच्या कर्णधाराने हॅटट्रिक नोंदवत इंग्लंडला ६-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली.

७)पनामाकडून फिलीप बॅलोयने ७८ व्या मिनिटाला गोल केला. विश्वचषकामध्ये पनामाचा हा पहिलाच गोल आहे.