FIFA World Cup 2022 मेस्सी मॅनिया आजपासून, सलामीच्या लढतीत अर्जेंटिना सौदी अरेबियाशी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ‘क’ गटात जगभरातील फुटबॉल शौकिनांच्या गळय़ातील ताईत असलेल्या लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ सैदी अरेबियाविरुद्धच्या लढतीने फिफा वर्ल्डकपच्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे. यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचा संघही जेतेपदाचा एक प्रबळ दावेदार आहे.

दोनवेळा जगज्जेतेपदाचा करंडक उंचावलेला अर्जेंटिनाचा संघ 36 वर्षांपासून तिसऱ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. या संघाने 1978 व 1986 मध्ये फिफाच्या सर्वोच्च स्पर्धेतील विजेतेपद पटकाविले होते. अर्जेंटिनाचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या संघाने या वर्षी एकदाही पराभवाचे तोंड बघितलेले नाही. या वर्षी खेळलेल्या 10 पैकी 8 लढतींत मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाने जिंकल्या असून 2 लढती ड्रॉ झाल्या आहेत. अर्जेंटिनाने या वर्षी प्रतिस्पर्धी संघावर 26 गोल नोंदविले, तर केवळ 2 गोल स्वीकारले आहेत. गतवर्षी ब्राझीलसारख्या संघाला हरवून त्यांनी कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब पटकाविला होता. त्यामुळे सौदी अरेबियाला सहज हरवून अर्जेंटिना संघ आपल्या वर्ल्डकपच्या अभियानास प्रारंभ करेल अशी फुटबॉलप्रेमींमध्ये चर्चा आहे.

दुसरीकडे सौदी अरेबियाचा संघ कारकीर्दीत सहाव्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. मागील वर्ल्डकपमध्ये यजमान रशियाने सौदी अरेबियाचा 5-0 गोल फरकाने धुव्वा उडविला होता. जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानी असलेल्या या संघाकडून वर्ल्डकपमध्ये फार काही अपेक्षा नाहीत.

आजच्या लढती

अर्जेंटिना वि. सौदी अरेबिया     (दुपारी 3.30 वाजता)

डेन्मार्क वि. टय़ुनेशिया (सायं. 6.30 वाजता)

मेक्सिको वि. पोलंड   (रात्री 9.30 वाजता)

फ्रान्स वि. ऑस्ट्रेलिया   (मध्यरात्री 12.30 वाजता)