
उल्हासनगर येथील नेहरू चौकात असलेल्या साई सिद्धी इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्याने पाच जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली आणखी चार-पाच जण तबल्याची भीती व्यक्त होत असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
नेहरू चौकातील बडोदा बँकेच्यासमोर साईसिद्धी ही पाच मजली इमारत आहे. रात्री या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब तळ मजल्यापर्यंत कोसळल्याने हाहाकार उडाला. या दुर्घटनेत पाच रहिवाशांच्या जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेचे वृत्त कळताच उल्हासनगर अग्निशमन दल, पोलीस आणि ठाणे महापालिकेची टीडीआरएफ टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत आणखी चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. या घटनेनंतर घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांचा आणि रहिवाशांचाआक्रोश सुरू होता.
























































