
सामना प्रतिनिधी । मुंबई
गल्लीबोळात जाऊन आग विझवणाऱ्या अत्याधुनिक बाईक्स मुंबई अग्निशमन दलात लवकरच दाखल होणार आहेत. या बाईक्समुळे पाण्याचे मोठे बंब पोहोचू शकत नसणाऱ्या चिंचोळय़ा ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या पाच गाडय़ा घेतल्या जाणार आहेत.
मुंबईच्या झपाटय़ाने वाढणाऱ्या दाटीवाटीच्या वस्तीमुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्या ठिकाणी पोहचताना कसरत करावी लागते. चाळी, गल्ल्या आणि उंच ठिकाणच्या वस्तीमध्ये पाण्याचे बंब पोहोचू शकत नाहीत. शिवाय मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या वाहतूककोंडीमुळे दुर्घटनेच्या ठिकाणी मोठी वाहने पोहोचण्यास उशीर लागतो. परिणामी जीवित आणि वित्तहानी जास्त होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलात आग विझवण्याची यंत्रणा असलेल्या सुसज्ज बाईक्स आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. अग्निशमन दलात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येत असून आगामी काळात आणखी गाडय़ा घेणे विचाराधीन आहे.
- मे. ब्रिजबासी फायर सेफ्टी सिस्टम प्रा. लिमिटेड कंपनीकडून ७१ लाख २७ हजार ८२२ रुपयांना या पाच बाईक्स घेण्यात येतील.
फायर बाईक्समुळे चिंचोळय़ा गल्ल्यांमधील आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवानांना सोयीचे ठरणार आहे. शिवाय या बाईक्स वेगाने घटनास्थळी पोहोचू शकणार असल्याने आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. - डॉ. प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दल प्रमुख
अशा असणार बाईक्स
- अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या बाईक्सवर दोन्ही बाजूला १०-१० लिटर पाणी असलेल्या टाक्या असतील. हे पाणी प्रचंड दाबाने आगीवर मारता येणार आहे.
- याशिवाय इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी खेचून आगीवर फवारता येणार आहे.
- पाणी घेऊन जाण्याची सोय गाडीवरच असल्यामुळे जवानांचा पाठीवरून पंप नेण्याची गरज भासणार नाही.
- अग्निशमन दलाचे दोन जवान या बाईकवर स्वार होऊन घटनास्थळी धाव घेऊ शकणार आहेत.































































