Navi Mumbai Fire – APMC मार्केट जवळील ट्रक टर्मिनलला भीषण आग; अनेक गाड्या जळून खाक

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळ असलेल्या तुर्भे ट्रक टर्मिनलला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगाची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून तब्बल 3 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीमध्ये अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास ट्रक टर्मिनलवर उभ्या ट्रक आणि माल वाहतूक कंटेनर्सला आग लागली. लाकडी कॅरेट आणि प्लास्टिकमुळे आग वेगाने पसरली. काही क्षणात आगीने उग्र रुप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट उठले. यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली.

आगीनंतर काही स्फोटाचे आवाजही ऐकू आले. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. त्यानंतर तब्बल तीन तास पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, या आगीमध्ये 8 ते 10 ट्रक, टेम्पो जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.