
दिवाळीनिमित्त घरोघरी विद्युत रोषणाईबरोबरच मोठय़ा प्रमाणात फटाके फोडले जातात. हा प्रकाशोत्सव साजरा करताना फटके फोडा, पण वीज वाहिन्या, विद्युत उपकरणांपासून दूर रहा असे आवाहन महावितरणने केले आहे. फटाक्यांमुळे आग लागणे, शॉर्टसर्किट होऊन जीवित -वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
दिवाळी म्हटले की सजावट, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आली. या आनंदोत्सवात फटाका घराच्या परिसरात फोडल्याने आग लागणे, वीज वाहिन्यांच्या खाली फोडल्या जाणाऱया फटाक्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन वीज वाहिन्या कोसळण्याचे प्रकार घडतात. सुरक्षेची खबरदारी घेतली तर अपघात टाळता येतो. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्यावीत, घर उजळवण्यासाठी मोकळ्या जागेतच दिवे लावावेत. मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर तसेच पंखे, वीज तारांपासून दूर ठेवावेत. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत, जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशनची टेप वापरावी, तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.
वीज पुरवठा खंडित होण्याची भीती
महावितरण राज्यभरात अखंडित वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. मात्र नागरिकांनी वीज वाहिन्या आणि उपकरणांच्या परिसरात फटाका फोडल्यास वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने फटाका फोडताना खबरदारी घ्यावी, उच्चदाब, लघुदाब वीज वाहिन्यांपासून दूर आतषबाजी करावी असे स्पष्ट केले आहे.































































