
सामना ऑनलाईन, तिरूअनंतपुरम
केरळमधील एका चर्चच्या ५ पादरींनी महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने जबरदस्त खळबळ उडाली आहे. कोट्टायम जिल्ह्यातील थिरूवल्ला गावातील चर्चमध्ये घडलेला हा प्रकार आहे. देवाच्या दारात या महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्यानं या सगळ्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. पिडीतेच्या पतीने एक ऑडीयो क्लिप व्हायरल केली आहे, ज्यात या पादरींनी केलेल्या कुरकर्माबद्दल तपशीलाने सांगण्यात आलं आहे.
लग्नापूर्वी सुरू झालेला मलानकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या पादरींचे हे घाणेरडे प्रकार महिलेच्या लग्नानंतरही सुरू होते. लग्नानंतर या महिलेने बाप्तीस्माच्या कार्यक्रमात दुसऱ्या एका पादरीला तिच्यासोबत झालेला प्रकार सांगितला. याही पादरीने तिला बदनाम करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करायला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाहीये. या पादरींवर करण्यात आलेले आरोप जुने असून त्यांची चौकशी सुरू असल्याचं चर्च तर्फे सांगण्यात आलं आहे. चौकशीमध्ये हे पादरी दोषी आढळले तर त्यांना पोलिसांच्या हवाली केलं जाईल असं चर्चच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

























































