
सामना ऑनलाईन, डोंबिवली
लोढा बिल्डरला 571 कोटी 33 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देणाऱया गुडगाव येथील पाच खंडणीखोरांविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठय़ा रकमेच्या खंडणीची मागणी झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोढा बांधकाम समूहाचे उपाध्यक्ष सुरेंद्रन नायर हे डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवर असलेल्या अयोध्यानगरी अंबिका टॉवरमध्ये राहतात. आज गुडगाव येथील खंडणीखोरांनी त्यांच्या मोबाईलवर व्हॉटस्अॅप मेसेज करून त्यांच्याकडे 571 कोटी 33 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास कंपनीची बदनामी करून कंपनीच्या सर्व अधिकाऱयांना खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकीही या खंडणीखोरांनी दिली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी विकास बागचंदका याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.




























































