
सातारा शहरातील दहावीतील मुलांनी कोयत्याचा धाक दाखवण्यासाठी तो क्लासमध्ये नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेऊन संशयितांकडून तो कोयता सॅकमधून जप्त केला. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून, पालकांनी वेळीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.
दहावीत शिकत असलेल्या काही पोरांची धुसफूस सुरू आहे. खुन्नसने पाहिल्याने सज्जड दम भरण्यासाठी चार ते पाच मुले एकत्र आली. ज्याला दम भरायचा आहे तोही दहावीतला. शाळेच्या आवारात राडा करण्याऐवजी बाहेरचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यासाठी क्लास हे ठिकाण ठरल्यानंतर एकाने सॅकमध्ये क्लाससाठी लागणाऱ्या वह्या पुस्तकांऐवजी त्यामध्ये कोयता घेतला.
क्लासमध्ये आल्यानंतर कोयत्याने धाक दाखवण्याची तयारी सुरू असतानाच क्लासमध्ये कोयता असल्याचे बिंग फुटले. यामुळे ज्या मुलाने कोयता आणला होता त्याला घाम फुटला. कोयता कोणाला दिसू नये यासाठी इतर त्याच्या चार ते पाच सहकाऱ्यांनी कोयत्याची पळवापळवी करण्यासाठी मदत केली. अखेर ही बाब समोर आल्यानंतर याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात गेली. कोयताप्रकरणी संबंधित मुलांची माहिती घेण्यात आली. ती मुले साताऱ्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकत होती. संबंधितांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी कोयता आणल्याच्या कृत्याची कबुली दिली. मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना बोलावून मुलांची खरडपट्टी काढण्यात आली.

























































