
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी बजेटसाठी बॅगेऐवजी लाल रंगाचे पिशवीसारखे दिसणारे फोल्डर वापरले. हे कापडी फोल्डर त्यांच्यासाठी एकदम खास होते. सीतारामन यांच्या मुंबईत राहणार्यां मामींनी स्वतःच्या हाताने ही पिशवी तयार केली होती. एवढेच नव्हेतर लाल फोल्डरमध्ये बजेटचे भाषण ठेवण्यापूर्वी त्यांच्या मामी ते घेऊन महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरात आशीर्वादासाठी जाऊन आल्या होत्या.
अर्थमंत्री बजेट सादर करायला जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या हातात सूटकेस असण्याची परंपरा होती. निर्मला सीतारामन यांनी या परंपरेला छेद देत लाल रंगाच्या कापडासारख्या दिसणार्यां पिशवीवजा फोल्डरचा वापर केला. या लाल फोल्डरमागची कहाणी काल सीतारामन यांनी कथित केली. त्या म्हणाल्या, आपल्याकडे हिशेबाच्या चोपडय़ा कपडय़ात गुंडाळून ठेवण्याची प्रथा आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही हिशेबाच्या वह्या कापडातच ठेवून त्यांची पूजाअर्चा होते. बजेटचे भाषण ठेवण्यासाठी मी लाल रंगाचे बुक कव्हर मागवले होते. मात्र त्याला क्लीप नसल्यामुळे पेपर पडू शकतात. त्यामुळे माझ्या मामीने आपल्या हाताने शिलाई करीत लाल कापडापासून फोल्डर तयार केले. ते फोल्डर घेऊन मामी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरात गेली. तोपर्यंत बजेटच्या कागदपत्रांसाठी सूटकेस आहे की नाही ही चर्चा सुरू झाली होती, मग मीच म्हटले असू दे, याच फोल्डरमध्ये मी माझं भाषण नेते. सीतारामन पुढे म्हणाल्या हे फोल्डर म्हणजे कुटुंबाची वस्तू वाटू नये, फोल्डरवर सत्यमेव जयतेचे चिन्ह लावले. या फोल्डरला वहीखाता नाव आपण दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही बँकेतून सेवा
येत्या काळात एका बँकेत खाते उघडून देशाच्या कोणत्याही बँकेत बँकिंग सेवा मिळण्याची सुविधा मिळेल. विदेशी मुद्रा लोन मिळण्याची प्रक्रियाही एकदम सोपी करण्यात येईल. टेलॉजीच्या मदतीने प्रत्येक बँक एकमेकांना जोडण्यात आली आहे. अशातच रिझर्व्ह बँकेच्या मदतीने एटीएमच्या धर्तीवर बँकेच्या नव्या सुविधेची व्यवस्था केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजच्या माध्यमातून लवकरच शक्य होईल.
























































