ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार याच्यावर बलात्काराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । साउ पाउलो

ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. हिंसाचार करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप नेमारवर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नेमारच्या वडिलांनी या आरोपांचं खंडन केलं असून फक्त ब्लॅकमेलच्या उद्देशाने नेमारला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता ही ब्राझीलचीच रहिवासी आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडिता आणि नेमार संपर्कात आले होते. त्यांच्यात इन्स्टाग्रामवरून काही संभाषणही झालं होतं. यानंतर नेमारने तिला मे महिन्यात पॅरिसला येण्याचं आमंत्रण दिलं. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, नेमार जेव्हा तिला भेटायला हॉटेलमध्ये आला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर काही वेळातच नेमारने महिलेवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने साउ पाउलो पोलिसात दाखल केली आहे.

दुसरीकडे नेमार याचे वडील सेंटोस यांच्या म्हणण्यानुसार, महिला आणि नेमार डेटवर गेले होते. मात्र, त्यानंतर नेमारने तिच्याशी नातं तोडलं होतं. त्यामुळे महिलेने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. महिलेने त्याबदल्यात पैशाची मागणी केल्याचंही सेंटोस यांचं म्हणणं आहे.