वीज बिलाच्या नावाखाली परदेशी महिलेची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज बिलाच्या नावाखाली ठगाने परदेशी महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार महिला या जपानच्या रहिवासी असून त्या एका विमान कंपनीत काम करतात. त्या सध्या वांद्रे येथे एका सोसायटीत भाडेतत्त्वावर राहतात. गेल्या आठवडय़ात त्या घरी असताना त्यांना मोबाईलवर मेसेज आला. जर वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल असे त्यात नमूद होते. तो मेसेज पाहिल्यानंतर त्यामध्ये नमूद असलेल्या नंबरवर महिलेने फोन केला. फोन केल्यावर ठगाने महिलेला एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर वीज बिल म्हणून 100 रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यावर सायंकाळी महिलेला मोबाईलवर मेसेज आला. खात्यातून 47 हजार रुपये काढले गेले. महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.