अर्थव्यवस्थेची वाटचाल आयसीयूकडे! माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल

712

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मरणासन्न झाली असून तिची वाटचाल आयसीयूकडे चालू असल्याचा जोरदार हल्लाबोल माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केला आहे. स्टील, ऊर्जा आणि इफ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांचे कर्ज एनपीएत गेल्यामुळे हे संकट ओढवले असल्याचेही सुब्रमण्यम म्हणाले.

हिंदुस्थानचे माजी आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी हॉर्वर्ड विद्यापीठात एक व्याख्यान दिले. यात त्यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी गहन चिंता व्यक्त केली. 2004 ते 2011 पर्यंत स्टील, ऊर्जा तसेच इफ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांना देण्यात आलेले कर्ज एनपीएत गेले आहे. 2017 ते 2018 या एकाच वर्षात रियल इस्टेट क्षेत्राचे 5 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यात एनबीएफसी कंपन्यांचा मोठा वाटा आहे. खासगी कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्ज थकवल्यामुळेही अर्थव्यवस्था संकटात सापडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून तिची प्रचंड पडझड झाली आहे. सशक्त असलेली ही अर्थव्यवस्था सध्या आयसीयूकडे मार्गक्रमण करत असल्याचा स्पष्ट आरोप सुब्रमण्यम यांनी केला.  

2014 मध्येही दिला होता इशारा

2014 मध्ये पदावर असतानाच आपण अर्थव्यवस्थेच्या पडझडीबद्दल सरकारला इशारा दिला होता असे अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात बँकांचा एनपीए वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेची कोंडी झाली. आता दुसर्‍या टप्प्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि रियल इस्टेटमध्ये नकदीचे मोठे संकट आहे. गेल्या वर्षी खुलासा झालेल्या 90 हजार कोटी रुपयांच्या कर्जामुळे हा बाजारच उठला आहे.

नोटाबंदीमुळे ‘एनबीएफसी’ची चांदी

रातोरात करण्यात आलेल्या नोटाबंदीनंतर बँकांमध्ये प्रचंड रोकड जमा झाली. या रकमेतील मोठा हिस्सा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या झोळीत टाकण्यात आला. एनबीएफसीने हा पैसा रियल इस्टेटमध्ये उधळला. 2017-18 मध्ये रियल इस्टेटचे 5 लाख कोटी रुपये थकीत कर्जाची जबाबदारी ‘एनबीएफसी’चीच असल्याचेही सुब्रमण्यम यांनी ठणकावून सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या