माजी सैनिकांची घरपट्टी, मालमत्ता कर माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील माजी सैनिकांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली आहे. राज्यातील सर्व माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नीला यापुढे घरपट्टी व मालमत्ता कर भरावा लागणार नाही. या योजनेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 मार्च, 2020 रोजी विधानसभेत जाहीर केली होती. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला समंती देण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना फायदा होईल.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे. मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून या योजनेला शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेमुळे आता नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळेल.