आता तर हद्दच झाली, भाजप नगरसेवकाचीच फॉर्च्यूनर गेली चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

शहरातून रोज 10-12 दुचाकी, एक दोन चारचाकी चोरीला जात असताना त्याकडे पोलीस कानाडोळा करत आहेत. मात्र, आता तर चोरट्यांनी हद्दच केली असून, महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक दीपक पोटे यांची महागडी फॉर्च्यूनर गाडी घरासमोरून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाजप युवा मार्चाचे शहराध्यक्ष, नगरसेवक दीपक पोटे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

नगरसेवक दीपक पोटे हे सिंहगड रस्त्यावर हॉटेल भंडारी जवळ रहातात. त्यांनी त्यांची गाडी रस्त्यावर लावली होती. गुरूवारी सकाळी 10 वाजता एका कार्यक्रमाला जायचे असल्याने ते गाडी जवळ आले असता, गाडी जागेवर नव्हती. तर चालकाला पोटे हे गाडी घेऊन जीमला घेऊन गेले असतील असे वाटल्याने त्यानेही चौकशी केली नाही. दरम्यान गाडीच्या दोन्ही चाव्या घरात असताना गाडी गायब असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत पोटे यांनी त्वरीत दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार केली. पोटे यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गाडीचा शोध सुरू केला असता, त्यांची गाडी मुंबईच्या दिशेने गेल्याचे समोर आले आहे. दत्तवाडी पोलीसही याचा तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यात वाहनचोरीचे प्रकार घडत असताना त्याचा पोलिसांकडून तपास केला जात नाही. अनेकदा गुन्ह्यांमध्ये गाड्यांचा वापर होत असताना गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकही बंद करण्यात आल्याने चोरट्यांना मोकळे राण मिळाले आहे.