औसा तालुक्यात शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू; चौघांना अटक, पाच जण फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शेतकऱ्यासह त्याची पत्नी, मुलगा आणि भाऊ गंभीर जखमी झाला होता. या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शिवलिंग सदाशिव साखरे (56) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर त्यांची पत्नी उज्ज्वला साखरे, मुलगा विदभद्र आणि भाऊ बाबुराव यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी किल्लारी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पाच जण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात सुरू असलेल्या वादातील शेत जमिनीत पेरण्यात आलेल्या तूर व ज्वारीचे पिके मोडल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचे रुपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झाले. 25 ऑक्टोबर रोजी राजेंद्र नारायण विभुते, नीळकंठ नारायण विभुते, नरेश राजेंद्र विभुते, ओमकार नीळकंठ विभुते व अन्य पाच अशा नऊ जणांनी शिवलिंग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला, तसेच मुलगा, पत्नी आणि भावालाही बेदम मारहाण केली. मुलगा विरभद्र याच्या डोक्यात 14 टाके पडले आहेत.

जखमींना उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शिवलिंग यांचे निधन झाले. त्यानंतर शिवलिंग यांचा भाऊ बाबुराव याने किल्लारी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात कलम 302, 307, 323, 324, 336, 120 (ब) 143 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर खुनाच्या प्रकरणातील चौघांना अटक केली असून फरार असलेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.