
पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील एका महिलेच्या सहा दिवसांच्या बाळाचा गळा दाबून त्याला पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटातील दरीत फेकून देणाऱ्या चार सख्ख्या भावांना पौड पोलिसांनी खेड येथून शिताफीने गजाआड केले आहे. मनाचा थरकाप उडवणारी ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती.
पुणे जिल्ह्यातील गोडांबेवाडी घोटावडे, तुळशी येथे राहणाऱ्या मंगल सचिन चव्हाण या 27 वर्षीय महिलेने 30 जानेवारी 2022 रोजी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर 4 फेब्रुवारीच्या रात्री तिची पहिली मुलगी आणि तिच्यासोबत शेळकेवाडी येथे राहणारा सचिन चव्हाण (मूळगाव खेड तालुक्यातील आंबडस) हे घरी असताना सचिन याचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण आणि अजित गंगाराम चव्हाण हे तिघेजण तिथे आले. या चार भावांनी मिळून आपण आपल्या गावी जाऊन राहू असे ठरवले.
ठरल्यानुसार एका कारमधून हे चार भाऊ आणि ती महिला व मुलं ताम्हिणी मार्गे खेडला यायला निघाले. निर्जन ताम्हिणी घाटातून जात असताना एका वळणावर गाडी थांबविण्यात आली. इथे या चारही भावांनी संगनमत करून सहा दिवसाच्या बाळाला त्या महिलेच्या कुशीतून ओढून त्याला खोल दरीत फेकून दिले.
या चारही जणांकडे बाळाची मागणी त्या महिलेने केली असताना तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 10 फेब्रुवारीला या चार भावांनी तीला शेळकेवाडी येथील जाऊन रहा असे सांगितले. मात्र संतापलेल्या मंगल हिने या घटनेची तक्रार पौड पोलिसांमध्ये केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनाही तात्काळ तपासाची सूत्रे फिरवली आणि 12 फेब्रुवारी रोजी या चारही जणांना पोलिसांनी आंबडस येथून ताब्यात घेतले. या चारही जणांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पौड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.



























































