
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
भरधाव कार उलटून झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी ११ वाजता करमाडजवळ घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून पलट्या घेत थेट शेतात जाऊन पडली. कारमधील तरुण संभाजीनगरहून साखरपुड्यासाठी परभणीला निघाले होते. मृतांमध्ये भावी वराचाही समावेश आहे.
शहरातील दिल्लीगेट भागातील फळविक्रेता शहजाद युनुस बागवान (२४) याचा आज दुपारी परभणी येथील इंडिया हॉटेलचे मालक फारुख भाऊ यांच्या मुलीशी साखरपुडा होणार होता. त्यासाठी शहजादचे कुटुंब सकाळीच परभणीकडे रवाना झाले होते. शहजाद व त्याचे मित्र अबुद हसन बीन समेदा (२४), गली.नं. २६ मधील उमर हसन बीन समेदा (२६), संजयनगरातील शफिक खान सलीम खान (२३), शरीफ कॉलनीतील शेख मोहंमद मुजफरोद्दीन वहिदोद्दीन (२४), भवानीनगर, दत्तनगरातील तबरेज खान शफिक खान (२३) स्वीफ्ट कारने सकाळी १० वाजता परभणीकडे जाण्यासाठी निघाले. करमाडजवळ कार येताच चालक अबुद हसन याचे नियंत्रण गेले. पलट्या घेत कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत आदळली. त्यामुळे कारचा दरवाजा तुटला. गाडी पुढे तशीच २०० फुट फरफटत गेली आणि सिमेंटच्या कंम्पाऊंड पोलला धडकली. दरवाजा तुटल्याने आत बसलेले सर्वजण बाहेर फेकले गेले. या घटनेत चार जण जागेवरच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतात चालक अबुद हसन, मोहमंद मुजफरोद्दीन, शहजाद बागावान आणि तबरेज यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह करमाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एसएस रोडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र साळवे, एन. पी. धोंडकर, राहुल मोहोलत यांनी धाव घेतली होती. अपघातात वाहनचालक अबूद हसन समेदासह मोहंमद मुजफरोद्दीन, भावी वर शहेजाद बागवान आणि तबरेज यांचे मृतदेह आणि जखमी झालेले उमर हसन समेदा आणि शफिक खान यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले.
घाटीत नातेवाईकांचा आक्रोश
साखरपुड्यासाठी जात असताना कारचा अपघात झाल्याचे कळताच मयत तरुणांच्या नातेवाईक आणि मित्रांनी घाटीत धाव घेतली होती. तरुण मयत झाल्याचे कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. नातेवाईकांच्या आक्रोशाने सर्वसामांन्यांचे डोळे पाणावले होते.
साखरपुड्यासाठी आला आणि जीव गमावून बसला
बायजीपुरा गली नं. १ मधील अबुद हसन बीन समेदा हा आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी तीन दिवसांपूर्वी सहपरिवार हैदराबादला गेला होता. तो सोमवारी संध्याकाळी संभाजीनगरात परतणार होता. मात्र, मित्र शहेजाद याचा साखरपुडा असल्याने तो आई वडिलांना हुलकावणी देउâन रेल्वेने सकाळी संभाजीनगरात आला आणि थेट बायजीपुऱ्यातून कार चालवत परभणीच्या दिशेने निघाला. मात्र, वाटेतच काळाने त्याच्यावर घाला घातला.
दोघांचे नुकतेच लग्न झाले होते
शरीफ कॉलनीतील मोहंमद मुजफरोद्यीन हा किराणा दुकान चालवतो. एक महिन्यापूर्वी त्याचे रत्नपूर येथील तरुणीशी लग्न झाले होते. तर भवानीनगरातील तबरेज खान हा चारचाकी वाहनाचा मॅकनिक असून त्याचे चारच महिण्यापूर्वी लग्न झाले होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने भवानीनगर आणि शरीफ कॉलनीवर शोककळा पसरली आहे.
शहेजाद बागवान एकुलता एक मुलगा
दिल्ली गेट येथील शहेजाद युनूस बागवान हा फळ विक्रेता असून तो आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून तिघींचे लग्न झालेले आहे. आज शहेजाद याचा साखरपुडा होणार होता. एकुलता एक मुलगा मरण पावल्याने बागवान परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला.

































































