
सामना ऑनलाईन । मुंबई
सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘आयटीआय’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवारपर्यंत एकूण ३ लाख ८३ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या विविध ८१ अभ्यासक्रमांसाठी हे अर्ज आले असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. ३० जूनला सायंकाळी ५ वाजता http://admision.dvet.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. बुधवारी तब्बल ११ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ३० हजार ६९० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून यांपैकी २ लाख १९ हजार ३५८ विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झाले आहेत. मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ३ जुलैपर्यंत मुदत आहे.आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर होईल.
























































