अलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणी चार नायझेरियन नागरिकांना अटक

11

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्याप्रकरणी 16 आरोपींना अटक केली होती. यामध्ये अजून चार नायझेरियन आरोपींना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 260 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये आहे. त्यामुळे या अमली पदार्थ गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवली असून त्याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. ओकोरो ल्यॅक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन आरोपींना याआधी अटक करण्यात आली असून कोडीचीन्मा प्रोमिस यूची (38), व ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोन आरोपींना 14 जुलै रोजी स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे.

28 जून रोजी अलिबागमध्ये किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात सात मॉडेलना अटक केली होती. यातील मुख्य आरोपी राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. पोलिसांनी कोकेन कुठून आणले याबाबत आरोपींकडे चौकशी केली. मुंबईतून कोकेन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना व हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दीपक अर्जुन अगरवाल या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 50 ग्रॅम कोकेनही जप्त केले होते. या पाच आरोपींची चौकशी केली असता या गुन्ह्यातील दोन नायझेरियन कोकेन विक्रेत्यांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार 14 जुलै रोजी पहाटे 2 वाजता स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचून कोडीचीन्मा प्रोमिस यूची, ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोघांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी 181 ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची बाजारात 9 लाख 5 हजार किंमत आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली असून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची बाजारात 13 लाख रुपये किंमत आहे. या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली.

या गुन्ह्यात चार नायझेरियन नागरिकांना अटक केल्याने गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ याच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पोलीस कर्मचारी करीत आहेत.