तिवरे धरणफुटी : अद्याप चारजण बेपत्ता, 19 मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून घडलेल्या दुर्घटनेत 23 जण वाहून गेले होते. त्यापैकी आतापर्यंत 19 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज रेश्मा चव्हाण यांचा मृतदेह सापडला असून एनडीआरएफ आणि स्थानिक मदत पथकांच्या सहाय्याने उर्वरित चारजणांचा शोध सुरूच आहे. दरम्यान, तिवरे भेंडवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण नगर परिषदेने 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

तिवरे धरणग्रस्तांसाठी मुंबईचा राजा मंडळातर्फे पाच लाखांची मदत
तिवरे धरणग्रस्तांच्या मदतीसाठी आता बाप्पाच धावला आहे. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने तिवरे धरणग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. मंडळातर्फे 5 लाख रुपये किमतीच्या गृहपयोगी वस्तू गावकऱयांना देण्यात येणार आहेत.