नांदेडकरांना 57 लाखांचा चुना लावणाऱ्या श्रीधर कोळपेला पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमधील जनतेला ‘कोळपे पाटील मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी’च्या माध्यमातून 57 लाख 58 हजार 750 रुपयांना चुना लावणाऱ्या श्रीधर कोळपेला पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. खरात यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

2017 मध्ये निवघा ता.हदगाव येथील डॉ.विनोदकुमार अग्रवाल यांनी कोळपे मल्टीस्टेट सोसायटीविरुध्द तक्रार दिली होती की त्यांची कोळपे कंपनीने 11 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा प्रकार 2013 मध्ये घडला होता. हदगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्यातील आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला.

दरम्यान श्रीधर कोळपेला औसा न्यायालयाने अशाच एका फसवणूक प्रकरणात तुरुंगात पाठविले होते. त्या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम 50 लाख रुपये भरावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यास दहा दिवसाच्या जामिनावर बाहेर सोडले होते. श्रीधर कोळपेने 50 लाखांपैकी फक्त 10 लाख रुपये भरले. त्यामुळे त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर श्रीधर कोळपेने नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला. नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान पैसे न भरल्यामुळे श्रीधर कोळपेला पुन्हा लातूरच्या तुरुंगात जावे लागले.

नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी येथील एमपीआयडी न्यायालयाकडून हस्तांतरण वारंटवर श्रीधर कोपळेला मंगळवारी लातूरच्या तुरुंगातून आपल्या ताब्यात घेतले. बुधवारी नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कत्ते, पोलीस उपनिरीक्षक सय्यद शरफोद्दीन, पोलीस कर्मचारी संभाजी शिवभगत, दर्शन यादव यांनी श्रीधर कोळपेला नांदेडच्या जिल्हा न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.रणजित देशमुख यांनी श्रीधर कोळपेने नांदेडमध्ये जवळपास शंभर ते दीडशे लोकांना फसविले आहे. फसवणुकीचा आकडा आज 57 लाख 58 हजार 750 असला तरी तो पुढे वाढण्याची शक्यता आहे. युक्तीवाद ऐकून न्या.खरात यांनी श्रीधर कोळपेला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.