नाकाबंदीत पोलिसांना ओळखपत्र मागणारा अल्पवयीन ‘तोतया’ पोलीस ताब्यात

824

संचारबंदीत वाहनांची तपासणी करण्यासाठी लावलेल्या नाकाबंदीत एका अल्पवयीन तोतया पोलिसाला निगडी पोलिसांनी आकुर्डीत पकडले. त्याच्याकडे पोलिसाची काठी आणि पुणे पोलिसांचे ओळखपत्र मिळाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस आकुर्डी परिसरात नाकाबंदी करीत होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास लष्करातील जवानांसारखी पॅन्ट घातलेला आणि दुचाकीला काठी असलेला एकजण आला. पोलिसांनी त्याला तपासणीकरिता थांबविले. त्यावेळी त्याच्या दुचाकीला पोलिसांची काठी दिसून आली. त्यावेळी पोलिसांनी त्याला काठीबाबत विचारले असता आपण पोलीस असल्याचे त्याने सांगितले. यासाठी त्याने पुणे पोलिसांचे ओळखपत्रही दाखविले. एवढ्यावर तो थांबला नाही तर नाकाबंदीतील पोलिसांना त्याने त्यांचे ओळखपत्र मागितले. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता तो तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.

बारावीपर्यंत शिक्षण झालेला तो तोतया पोलीस ओटा स्कीम परिसरात राहत असून त्याचे वडील रिक्षा चालक आहेत. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना काठी आणि ओळखपत्राच्या आधारे भिती दाखवून पैसे उकळत असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या