
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही वर्षांपासून सतत सुरू असलेल्या बांधकाम व्यवसायामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलून गेला. यात पहिला बळी गेला तो चाळ संस्कृतीचा. त्यानंतरही विकास आणि पुनर्विकासाची ही प्रक्रिया थांबलेली नाही. मुंबईतील विविध भागांत तसेच मिलच्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास सुरू झाला आहे. या बदलत्या मुंबईचा वेध रेखाटनातून घेत आहे फ्रेंचमधील आर्किटेक्ट फेरीन फिलिप्स (25) ही तरुणी.
प्रभादेवीच्या कामगारनगर-2 मध्ये दुपारच्या वेळी बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर फेरीन एकाच जागी दीड ते दोन तास बसून घरांची रेखाटने काढत होती. एक परदेशी गोरी मुलगी, सातासमुद्रापार इथे येऊन आपले राहणीमान आणि घरांमध्ये एवढी रुची घेत आहे, याचे प्रचंड कौतुक मुलांना होते. मुलांनीही तिच्याशी इंग्रजीतून संवाद साधल्यावर ती आश्चर्यचकित झाली. मुलांनी तिच्याबरोबर फोटोही काढले.
फ्रान्सची फेरीन आर्किटेक्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मुंबईत येत आहे. तीन वर्षांपूर्वी तिने मुंबईतल्या चाळींवर प्रबंध लिहून आपली आर्किटेक्चरमधील मास्टरी पूर्ण केली. चाळीनंतर मुंबईत दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपडपट्टय़ा आणि त्यावर होणारी पुनर्विकासाच्या प्रक्रियेने तिचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्किटेक्चर असल्यामुळे आता ही प्रक्रिया तिने आपल्या रेखाटनातून मांडायला सुरुवात केली आहे. एखादी गोष्ट थेट कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा ती आपल्या शरीरात भिनवून घेणे आणि त्यानंतर रेखाटनातून उतरवणे तिला आवडते.
मुंबईचा पुनर्विकास हा श्रीमंतांसाठी होत आहे. झोपडीधारकांना एसआरएमध्ये घरे मिळतात. पण त्यांची अवस्था खूप वाईट असते. काही वेळा त्यात त्यांना फसवले जाते. त्याला जबाबदार कोण? बदलची ही प्रक्रिया थांबवता येत नाही, हे मान्य. झोपड्यात अनेक वर्षे आनंदाने राहणाऱ्या कुटुंबांना ‘एसआरए’च्या नावाखाली खुराड्यात टाकले जात आहे. – फेरीन फिलीप्स, आर्किटेक्ट




























































