मोक्कातील बडतर्फ पोलिसाच्या फरार पुतण्याला अटक; दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनी व्यवहारात फसवणूक करीत खंडणी प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस अमंलदाराच्या फरार पुतण्याला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. मोक्का कारवाई झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार झाला होता. मात्र, पथकाने रविवारी रात्री एकच्या सुमारास त्याला जेरबंद केले. जयेश जितेंद्र जगताप (वय 32, रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मोक्का प्रकरणातील फरार आरोपी जयेश जगताप मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक शेख, सुमीत ताकपेरे, नीलेश शिवतरे यांनी केली.

ओळख लपविण्यासाठी टी-शर्ट अन बरमुडा पॅन्ट
मोक्का गुन्हा दाखल झाल्यानंतर जयेश जगताप मागील काही महिन्यांपासून फरार झाला होता. त्यानंतर तो रविवारी मार्केटयार्ड परिसरातील चौपाटीजवळ फिरण्यासाठी आला होता. त्यासाठी त्याने पोलिसांपासून ओळख लपविण्यासाठी टी-शर्ट आणि बरमुडा पॅन्ट घातला होता. मात्र, शिपाई सुमीत ताकपेरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली.