आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरुस्तीसाठी गडनदी धरण रिकामे करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे.डी. पराडकर । संगमेश्वर

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरुस्ती कामासाठी हे धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्यामुळे धरणालगतच्या गावांसह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता गडनदी प्रकल्प अभियंता व संगमेश्वर तहसीलदार यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी 8 डिसेंबर 2018 रोजी गडनदी धरण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी धरणाची सद्य:स्थिती जाणून घेतली. यावेळी धरण दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी स्पष्ट करीत आपत्कालीन सेवाद्वाराची दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गडनदी धरण प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाने सर्वेक्षण केले आहे. याकरिता सध्या धरणात असलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अभियंता गडनदी प्रकल्प उपविभाग कुचांबे सज्ज झाला आहे.

धरणातील पाणी नदीद्वारे सोडून देऊन धरण रिकामे करण्याबाबतची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. याबाबतचे निर्देश लगतच्या मंडल अधिकारी तलाठी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नदीद्वारे धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याच्या कालावधीत धरणालगतच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहवे, असा इशारा कुटगिरी, कळंबुशी, कासे, असावे, आरवली, कोंडिवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी आदी गावांना देण्यात आला आहे.