
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्या असून, सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या चोरीची घटना लक्षात आली. याप्रकरणी नेवासा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील येथील मंदिरातून तीन घंटा चोरीस गेल्या होत्या. त्यावेळी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता, याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
सध्या गहिनीनाथ महाराज मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य सभामंडप आहे. त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला या अकरा लहान-मोठ्या आकाराच्या घंटा बांधलेल्या होत्या. चोरांनी लोखंडी पाईपसह या सर्व घंटा चोरून नेल्या आहेत. चोरी झाल्यानंतर सदर घटनेची खबर उपसरपंच श्रीकांत पवार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून घटनेची माहिती घेतली.
पोलीस प्रशासनाने गावातील तीन व्यावसायिकांकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे गावात येतानाच्या दिशेने असल्याने त्यात अपयश आले. चोरटे चोरी करून पाचेगाव फाट्याच्या दिशेने गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणाकडेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरांचा सुगावा लागला नाही. चोरटे परिसरातीलच असावेत, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
यापूर्वीदेखील याच मंदिरातून तीन घंटा चोरीस गेल्या होत्या. त्यावेळी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता, त्याचा फायदा घेत चोरट्यांनी आता तब्बल पितळी 11 घंटा चोरी केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना समक्ष भेटून निवेदन दिले आहे. या निवेदनात मंदिरातील चोरीचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, अशोक नांदे, ग्रामपंचायत सदस्य वामन तुवर, शांताराम तुवर, दीपक शिंदे, काशिनाथ मतकर, जालिंदर विधाटे, दत्तात्रय पाटील, नारायण नांदे, शशिकांत मतकर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला भाविकांच्या सह्या आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनंतर नेवासा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




























































