
जगात चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या हिंदुस्थानच्या हवाई दलाचा आज 90 वा वर्धापन दिन. देशभरात हा दिवस जल्लोषात साजरा केला जातो. हवाई दलाच्या योगदानाला आणि वायूविरांना अभिवादन करण्यासाठी या दिवशी सामान्य लोकांसह सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही शुभेच्छा संदेश शेअर करतात. या खास क्षणी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही एक ट्विट केले. परंतु यात एक चूक होती आणि त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शुभेच्छा संदेश लिहिला होता. मात्र यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये हिंदुस्थानऐवजी पाकिस्तानच्या लढाऊ विमानाचा फोटो लावण्यात आला होता. नेटकऱ्यांनी ही चूक पकडली आणि त्यांना ट्रोल केले. चूक लक्षात आल्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत यांनी हे ट्विट डिलिट केले आणि नवीन फोटोसह ट्विट केले. परंतु तोपर्यंत जुने ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते.

8 ऑक्टोबर 1932 रोजी हिंदुस्थानच्या हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ ओळख असलेल्या हिंदुस्थानच्या हवाई दलाने 1945 च्या दुसऱ्या महायुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर यातील रॉयल हा शब्द काढुन फक्त ‘भारतीय हवाई दल’ असे करण्यात आले.

चौथे मोठे हवाई दल
दीड लाखांहून अधिक सैन्य, 1500 हून अधिक विमानं आणि हेलिकॉप्टरसह सज्ज असणारे हिंदुस्थानचे हवाई दल जगातील चौथे मोठे हवाई दल आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हिंदुस्थानचा नंबर लागतो. प्रत्यक्ष लढाईसह नैसर्गिक आपत्तीत बचावकार्यामध्येही हिंदुस्थानचे हवाई दल मोलाचे योगदान देते.
बचावकार्यातही सहभाग
हवाईदलाने नेहमी देशामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात चक्रीवादळ (1998), त्सुनामी (2004) आणि उत्तर हिंदुस्थानातील पुराचा तडाख्यात हवाईदलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हवाई दलाने पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचा जागतिक विक्रम केला आहे. ‘राहत’ असे या मोहिमेचे नाव होते आणि हवाईदलाने 20,000 लोकांची सुटका केली होती.




























































