भूमाफियांमुळे गणेश मूर्तिकार अडचणीत, जागांचे दर वाढल्याने गणपती महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेश मूर्तीकारांना मुंबईत जागा मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार्‍या जागांचे दर परवडतात. पण मूर्तीकारांच्या नावाखाली भूमाफियांनी या क्षेत्रात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केल्याने मुंबईतील पारंपरिक मूर्तीकार अडचणीत आले आहेत.

गणेशमूर्तीची ने-आण करण्यासाठी सोयीस्कर जागांना मूर्तीकारांकडून अधिक मागणी असते. पण या मोक्याच्या जागांसाठी आकारण्यात येणारे दर जवळपास दोन ते साडेतीन लाख रुपयांच्या घरात या वर्षी पोहचले आहेत. ज्यांना कोणताही अनुभव नाही, असे भुरटे मूर्तीकार तसेच भूमाफियांनी मोक्याच्या जागा अडवल्यामुळे पारंपरिक मूर्तीकारांना मुंबईत जागा मिळणे कठीण झाले आहे.

मुंबई पालिकेकडून गणपती बनविण्यासाठी भाड्याने जागा उपलब्ध करून देण्यात येते. पण ज्यांचा गणेश मूर्ती बनविण्याशी संबंध नाही अशा व्यक्ती या जागा ताब्यात घेऊन दुसर्‍यांना अवाच्या सवा दराने विकतात. त्यामुळे वर्षानुवर्षे या क्षेत्रात काम करणार्‍यांना जागा मिळत नाहीत. जागांचे दर वाढल्याचा थेट परिणाम गणपतीच्या मूर्तींच्या किमतीवर होत असून गणेश मंडळांनादेखील त्या परवडणार्‍या नसल्याचे प्रसिद्ध मूर्तीकार रमेश रावले यांनी सांगितले.

गणेशमूर्तींना महागाईचा फटका

कारखान्यांच्या जागांचे वाढलेले भाडे. मूर्ती कारागीरांची मजुरी, काथ्या, लोखंड, स्टील, रंग, पीओपी यासारख्या वस्तूंचे वाढलेले दर, वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत साधारणातः 20 ते 25 टक्के वाढ या वर्षी होण्याची शक्यता आहे.

  • एका गाळ्यासाठी दोन ते साडेतीन लाख भाडे
  • गाडीवर मूर्ती बनविण्यास 10 ते 15 हजार भाडे
  • मंडपासाठी 35 ते 50 रुपये स्क्वेयर फूट दर

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मुंबईत जागेची मोठी अडचण आहे. ज्या जागा उपलब्ध आहेत त्यासाठी आकारण्यात येणारे भाडे खूपच जास्त आहे. मूर्तीकार आणि गणेश मंडळांना परवडतील अशा दरात जागा मिळावी. – रेश्मा खातू, मूर्तीकार 

गणपती कारखान्यांना जागा उपलब्ध करून देताना खरोखरच मूर्तीकार आहेत का, हे पाहणे आवश्यक आहे. सरकारने याकामी पुढाकार घेऊन जर योग्य दरात जागा मिळवून दिल्यास गणेशमूर्तींच्या किमती 35 टक्क्यांनी कमी होतील. – रमेश रावले, मूर्तीकार