
भक्तीभावाने पूजा अर्चना केल्यानंतर पाच दिवसांच्या गौरी गणपतींना मंगळवारी भक्तीभावात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी शास्त्री व सोनवी बावनदी किनाऱ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसांच्या 7 हजार गणपतींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
आज पाऊस असूनही भक्तगणांचा उत्साह असल्याचे पहायला मिळाले. वाजतगाजत गुलाल उधळत विसर्जन करण्यात आले. गेल्यावर्षी कोरोनामुळे मिरवणूका अथवा विसर्जनाप्रसंगी ढोलताशा पथके नसल्याने भक्तगणांमध्ये नाराजी होती. यावर्षी मात्र भक्तगणांनी आपला उत्साह कायम असल्याचे दाखवून दिले.
आज पाच दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात येणार असल्याने मिरवणूकीसाठी ग्रामीण भागासह शहरी भागात जय्यत तयारी करण्यात आली होती. अनेकांनी हातगाड्या सजविल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेशभक्तांना गणरायाला भक्तीभावात निरोप दिला. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शास्त्री सोनवी व बावनदी किनारी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले होते. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सावधगिरी बाळगण्यात येत होती.




























































