
हौशी राज्यनाट्य स्पर्धा ही एक हौस आहे… ती कलाकाराची भूक आहे… या राज्यनाट्य स्पर्धेनेच व्यवसायिक रंगभूमीला दर्जेदार कलाकार दिले आहेत. आपण स्वतः सातव्या राज्य नाट्यस्पर्धेतील सहभागी कलाकार होतो. तोच मी पुढे 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. ही या स्पर्धेची ताकद आहे. खेड्यापाड्यातील कलाकारांना ही राज्य नाट्यस्पर्धा नवी उभारी देणारी, चेतना देणारी स्पर्धा आहे. राज्यसरकारने राज्य नाट्यस्पर्धा आयोजित करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. यातून खेड्यापाड्यातील आणि शहरातील नवोदित कलाकारांना उभारी मिळेल, अशी आशा ज्येष्ठ नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केली.
अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तसंच नाट्यगृह, चित्रपटगृह ही माणसाची सांस्कृतिक भूक भागवणारी केंद्र आहेत. ही सांस्कृतिक केंद्र सुरु झाली नाहीत तर माणूस निराश होईल. पुन्हा नाट्यगृहं सुरु होत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. गेल्या दोन वर्षात अनेक कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट, रोजंदारीवर काम करणाऱ्या मंडळींची अवस्था बिकट झाली आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा सुरु झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. महाराष्ट्र शासनाने राज्य नाट्यस्पर्धा घेण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. देशामध्ये सलग साठ वर्षे हौशी रंगभूमीवर राज्यनाट्य स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या स्पर्धेतून संगीत रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीला फार मोठे कलाकार दिले आहेत. ही स्पर्धा कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी आहे. त्यातून कलाकार पुन्हा उभे राहतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या काळामध्ये नाट्यगृहे बंद होती. चित्रपटगृहे बंद होती. त्याचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा चित्रपटगृहे नाटयगृहे सुरु होत आहेत. याबद्दल समाधान व्यक्त करताना लेखक गंगाराम गवाणकर म्हणाले की, जसजसे प्रयोग वाढत जातील तसतशी प्रेक्षकांची संख्या वाढेल. आपल्याला हे सर्व कोरोनाचे नियम पाळूनच करावे लागेल. एका विषाणूने मानव जातीला कसं वागायचं ते शिकवलं आहे. माणूस हा प्राणी हार मानणारा नाही. आलेल्या संकटावर मात करणे हा त्याचा स्वभाव आहे. तो कोरोनावरही मात करेल आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु होईल. हे सुरु होताना प्रेक्षकाची सांस्कृतिक मनोरंजनाची भूक भागवणे गरजेचे आहे. ती दडपता येणार नाही. त्यामुळे पुन्हा या क्षेत्राला चांगले दिवस येतील, असा विश्वास नाटलेखक गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केला.





























































