
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत एका 25 वर्षीय एअर होस्टेसवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पीडीत तरुणीच्या सहकर्मचार्याला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
एअर होस्टेस तरुणी सोमवारी हैद्राबादहून मुंबईत 7 वाजता उतरली. तेव्हा तरुणीची एअरपोर्टवर स्वप्नील बदोनिया या तरुणाला भेटली. तरुणी ज्या एअरलाईन्स कंपनीत काम करते त्याच कंपनीत स्वप्नील हा सुरक्षा विभागात काम करतो. दोघांनी एअरपोर्टवरून टॅक्सी पकडली, स्वप्नील मालाडच्या मॉलमध्ये उतरला आणि तरुणी आपले सामान घेऊन घरी गेली. तरुणी परत मॉलमध्ये गेली जिथे स्वप्नील तिची वाट पाहात होता. दोघेही मॉलमधल्या एका बारमध्ये गेले आणि खूप दारू प्यायले.
तरुणीने इतकी दारू प्यायली होती की तिला शुद्धच नव्हती. तिने स्वप्नीलला घरी सोडण्याऐवजी कुठल्यातरी हॉटेलमध्ये जाण्याची गळ घातली. परंतु दोघे इतके प्यायले होते की हॉटेलवाल्यांनी दोघांना रुम देण्यास नकार दिला. अखेर स्वप्नीलने तिला आपल्या घरी येण्यास राजी केले. स्वप्नील आणि त्याचे दोन मित्र एका खोलीत राहात होते.
शेवटी स्वप्नीलने तिला आपल्या रुमवर नेले. तिथे दोन तरुणांसह एक तरुणीही उपस्थित होती. तरुणांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आणि तिघांनी आळीपाळीने आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सकाळी 10 वाजता उठल्यानंतर तिला शुद्ध आली. तिच्या डोळाख्याली आणि दंडावर जखम होती. जेव्हा तिने स्वप्नीलला याबाबत विचारले तेव्हा आपल्याला काहीच आठवत नसल्याचे त्याने सांगितले. रुमवर जी दुसरी तरुणी होती, तिला पीडितेने आदल्या रात्रीबद्दल विचारले. तिने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
पीडित तरुणीचे वडिल तिला रात्रभर फोन करत होते, परंतु तिने फोन उचलला नाही. पीडित तरुणीच्या एका मित्राला ती जोगेश्वरीच्या मॅकडॉनल्डजवळ आढळली आणि त्याने तिला घरी पोहोचवले. घरी पोहोचल्यावर तिने सारी हकीकत सांगितली. वडिलांनी तिला तत्काळ इस्पितळात दाखल केले. इस्पितळाच्या प्रशासनाने पोलिसांना पाचारण करून माहिती दिली.
पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा आरोप दाखल करून मुख्य आरोपी स्वप्नील बदोनियाला बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नीलला 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून इतर दोन आरोपींची चौकशी सुरू आहे.



























































