पाच गावांचा एक गणपती, श्री क्षेत्र गणपतीपुळ्यातील गणेशोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक गाव एक गणपती… नव्हे पाच गावांचा एक गणपती. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात जपली गेली आहे. गणपतीपुळेसह आजूबाजूच्या पाच गावांत घरांमध्ये गणपती आणला जात नाही. मंदिरातील गणपती हाच त्यांचा गणपती असतो.

त्याचीच मनोभावे पूजाअर्चा केली जाते. कोरोनामुळे मात्र आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेणे अवघड बनले आहे. यंदा पाच गावांतील प्रत्येकी 25 ग्रामस्थांना श्री गणपतीपुळे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजाकडून दर्शन दिले जाणार आहे तर अन्य भक्तांना गणपतीपुळेच्या ऍपवरुन बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात पाच गावांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर या पाच गावांचा हा गणपती असतो. गावकरी घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करत नाहीत. श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरातील गणपती हाच त्यांच्या घरातला बाप्पा असतो. कोरोनामुळे गतवर्षीपासून गणेशोत्सवात बाप्पाचे दर्शन किंवा त्याची पुजाअर्चा करण्याची संधी भाविकांना मिळाली नाही.

यंदा 25 दर्शनार्थींची निवड ग्रामपंचायत स्तरावर केली जाणार आहे. मंदिरातील गणेशोत्सव पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. हा उत्सव गणपतीपुळे मंदिर या मोबाईल ऍपवर ऑनलाईन पाहता येणार आहे. सध्या गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापन गणेशोत्सव तयारीचे नियोजन करत असताना प्रशासनाच्या अधिकृत आदेशाची वाट पहात आहे.

एलसीडी स्क्रीनवर दर्शन

दुसरी लाट ओसरताच पर्यटक गणपतीपुळ्यात येऊ लागले आहेत. कळसाच्या दर्शनाऐवजी पर्यटकांना बाप्पाचे दर्शन व्हावे याकरीता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एलसीडी स्क्रीन बसवण्यात आली आहे. त्या स्क्रीनवर बाप्पाचे दर्शन घेऊन भाविक घरी परततात. गणपतीपुळे मंदिर ऍपवर आतापर्यंत 17 हजार भाविकांनी बाप्पाच्या पुजाअर्चा आणि आरतीचे दर्शन घेतले आहे.