आचरे गावाची गावपळण सुरू, तीन दिवस वेशीबाहेर मुक्काम; निसर्गाच्या सान्निध्यात ठोकले तंबू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आचरे गावाची गावपळण आज गुरुवारी सुरू झाली. श्री देव रामेश्वराने कौल दिल्यास रविवारी किंवा सोमवारी या गावपळणीची सांगता होईल. आचरा गावात गावपळणीसारखी प्राचीन प्रथा आजही आनंदाने पाळली जाते. आजच्या आधुनिकतेच्या जमान्यात गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन ही पारंपरिक प्रथा जपत आहेत. या गावपळणीच्या निमित्ताने आचऱयातील सर्व लोक गावाच्या वेशीबाहेर तीन दिवस मुक्काम ठोकणार असून निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी तंबू ठोकले आहेत.

आचरा गावाला भरभरून निसर्ग लाभला आहे. अरबी समुद्रकिनारी, डोंगर कपाऱयांमध्ये वसलेले आचरा गाव साडेसहा हजार लोकवस्तीचे आहे. रामेश्वराच्या श्रद्धेपोटी गावकरी गावपळणीची प्रथा आजही जोपासतात. देवदिवाळीला रामेश्वराला प्रसाद लावला जातो. पाच-बाराचे मानकरी एकत्र येऊन देवाला गावपळणीसंबंधी विचारतात. त्यानंतर देवाने कौल दिला की गावपळणीचा दिवस ठरवला जातो. आचरावासीय देवाचा आदेश मानून गावाबाहेर जातात. घरादारांना टाळे ठोकून गोठय़ातील गाई, वासरे, कोंबडय़ा, कुत्रे सर्वांना घेऊन वेशीबाहेर पडतात.

गुरुवारी दुपारी सर्व गावकऱयांनी रामेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार बंद झाल्यावर वेशीबाहेर जाण्यासाठी प्रस्थान केले. पारवाडी येथील लोक आचरा नदीपलीकडच्या मुणगे येथे तंबू उभारून राहत आहेत, तर आचऱयातील इतर भागातील चिंदर, त्रिंबक, वायंगणी तसेच आजुबाजूच्या गावात राहणे पसंत केले. गावपळणीचा सर्वात जास्त आनंद लुटत आहेत ते पारवाडी येथील ग्रामस्थ.

गप्पांचे फड रंगतात
गॅस सिलिंडर, मिक्सरही यावेळी वापरता येत नाही. हे सर्व विसरून महिला चुली, पाटा-वरवंटा याचा अन्न शिजवण्यासाठी वापर करतात. विजेची सोय नसली तरीही टपोऱया चांदण्यात थोरामोठय़ांचे गप्पांचे फड रंगतात. दरम्यान, गावपळणीच्या काळात गावात चोरी होणे किंवा गावपळणीत सहभागी झालेली व्यक्ती आजारी होण्याचे प्रकार होत नाहीत. आमची रामेश्वरावर नितांत श्रद्धा असल्यामुळे आमचे कोण काय वाईट करणार असे गावकरी सांगतात.

तीन दिवसांनी परतीचा कौल
श्री देव रामेश्वराच्या कौलाने वेशीबाहेर गेलेला गाव तीन दिवस-तीन रात्रींनंतर देव रामेश्वर यांच्या हुकमाने परततो. या तीन दिवसांत चिंदरमधील रामेश्वर मंदिरात दुपारी 2 वाजता बारापाच मानकऱयांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारापाच मानकरी रामेश्वर मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. हुकूम मिळाला तर गाव पुन्हा भरवला जातो.