‘बायल्या’ म्हणून चिडवल्याने नंदुरबारच्या तरुणाची चेन्नईत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना ऑनलाईन, मुंबई

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा रहिवासी असलेल्या एका तरुणाने चेन्नईमध्ये आत्महत्या केली आहे. अविंशू पटेल (20 वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला सातत्याने मुलीसारख्या वागण्यामुळे हिणवलं जात होतं. याला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. अविने लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण सविस्तर पद्धतीने लिहिलं आहे.

अविने आपण समलिंगी असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. “मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र माझ्या हावभावांद्वारे भावना प्रतिबिंबीत होत राहिल्या. माझा ते लोकं तिरस्कार करायचे, मला हिजडा, छक्का, बायल्या म्हणायचे. माझं शरीर हे पुरुषाचं होतं. मात्र मी महिलेसारखा वागत होतो, याबद्दल मला खेद वाटतोय” असं अविने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. याबाबतचे वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.

अवि हा अत्यंत गरीब घरातला आहे. अविच्या अंत्यसंस्कारासाठीही त्याच्या आईवडिलांकडे पैसे नसल्याचं अविचे काका दीपक यांनी सांगितले आहे. अविने नंदुरबारमध्ये रेखा चौधरी यांच्याकडे सलूनमध्ये कामाचे प्रशिक्षण घेतलं होतं. तिथून तो काही दिवस मुंबईला आणि नंतर चेन्नईला कामासाठी गेला होता. अविचे एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते असा संशय आहे. या पुरुषाला अवि त्याला फसवत असावा असा संशय होता, असंही बोललं जात आहे.

अविने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये हिंदुस्थानात समलिंगींचा तिरस्कार केला जातो आणि हिंदुस्थानात समलिंगींना जन्माला घालूच नकोस अशी देवाला प्रार्थना केली आहे. “माझ्या मृत्युनंतर मी देवाला विचारणार आहे, की मला असं का बनवलंस? असंही अविने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.”