सवत्यासाठी केली पत्नीची हत्या, कोर्टाने सुनावली जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मिडल्सबरो

इंग्लंडमध्ये बायकोची हत्या केल्याचा आरोप असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाला तिथल्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मितेश पटेल (वय-37 वर्ष) असं या आरोपीचे नाव असून तो पेशाने फार्मासिस्ट आहे. मितेशने त्याची बायको जेसिकाचा (वय-34 वर्ष) खून केल्याचं साक्षीपुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मितेशचे ऑस्ट्रेलियातील एका मित्राशी समलिंगी संबंध होते, त्याच्यासोबत लग्न करण्यात जेसिकाचा अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी मितेशने बायकोचा खून केला.

मितेशने सुनावणी सुरू असतेवेळी आपण निर्दोष असून घरात घुसलेल्या चोराने बायकोची हत्या केल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी मितेशचा आरोप खोडून काढत त्यानेच हा सगळा चोरीचा  कट रचल्याचं सिद्ध केलं होतं. पोलिसांनी हे देखील सिद्ध केलं की मितेशने जेसिकाला आधी इन्सुलिनचा ओव्हरडोस दिला आणि नंतर प्लॅस्टीकच्या पिशवीचा वापर करून तिचा गळा आवळला, ज्यात तिचा मृत्यू झाला.

मितेश आणि त्याचा मित्र डॉ.अमित पटेल यांचे समलिंगी संबंध आहेत. या दोघांनी जेसिकाच्या मृत्यूनंतर तिच्या विम्याचे पैसे वापरून नवं आयुष्य सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. तसंच जेसिकाचं स्त्रीबीज गोठवून त्याद्वारे अपत्यप्राप्तीही करून घेण्याचं दोघांनी ठरवलं होतं.